सांगली: खासदार संजय पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर, भाजप आमदार-खासदारांमध्ये कोरोनावरुन सामना
Gopichand Padalkar vs Sanjay Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सांगली (Sangli) जिल्ह्यात भाजप (BJP) आमदार आणि खासदार यांच्यातच सामना रंगला आहे. हा सामना कोरोना व्हायरस संसर्ग आणि जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या बदलीच्या मुद्द्यावरुन रंगला आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि संजय पाटील (Sanjay Patil) असे या अनुक्रमे आमदार खासदारांचे नाव. पडळकर विरुद्ध पाटील हा सामना सांगलीतील जनतेला तसा नवा नाही. गेले प्रदीर्घ काळ हा सामना सांगली जिल्हा पाहात आहे. मुद्दा कोणताही असला तरी दोन्ही नेत्यांमधील सत्तासंघर्ष लपून राहिला नाही. दोन्ही नेते वेगवगळ्या पक्षात असतानाही आणि एकाच पक्षात असतानाही. आता निमित्त ठरले आहे. कोरोना व्हायरस संक्रमण आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या.

जिल्ह्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वाढते आहे. ही वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक हे प्रमुख अधिकारी अपयशी ठरल्याचे दिसते. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी खासदार संजय पाटील यांनी सोमवारी (10 ऑगस्ट) केली. मात्र, खासदार संजय पाटील यांच्या मागणीला भाजपचेच विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध दर्शवला. कोरोना काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे हे चूकीचे असल्याचे मत आमदार पडळकर यांनी व्यक्त केले आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते विशाल पाटील यांनीही अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे चुकीचे आहे असे म्हणत खा. संजय पाटील यांच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. (हेही वाचा, पार्थ पवार केवळ निमित्त शरद पवार यांना राष्ट्रवादीतूनच आव्हान मिळते आहे काय?)

एकाच पक्षात असले तरी पडळकर आणि संजय पाटील यांच्यातील संघर्ष कायम आहे. लोकसभा निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर हे भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्या वेळी भाजपने संजय काका पाटील यांना तिकीट दिले. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर उभे राहिले. तर वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर उभे राहिले. या निवडणुकीत स्वाभिमानिकडून उभ्या असलेल्या विशाल पाटील यांचे पारडे जड ठरत होते. मात्र, गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे मतविभाजन झाले आणि संजय काका पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, खासदार संजय पाटील यांच्या मागणीला विरोध करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्वच अधिकारी चांगले काम करत आहेत असे मला वाटते. त्यामुळे माझा त्यांना पाठिंबा आहे. तर विशाल पाटील यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील अधिकारी चांगले काम करत आहेत. कोरोना काळात अधिकाऱ्यांची बदली कराव असे वाटत असेल तर मग महापूर आला तेव्हा लोकांची अवस्था यापेक्षाही दयनीय झाली होती. तेव्हा का अधिकाऱ्यांच्या बदलीचा विचार मनात आला नाही असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.