पत्रकाराला कोरोनाची लागण (PC - File Image)

Coronavirus: मुंबईतील एका नामांकित वाहिनीच्या सक्रीय पत्रकाराची (Journalist) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आली आहे. तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्व माध्यमांतील लोकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत.

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत वृत्तवाहिन्यांच्या सर्वच प्रतिनिधींकडून अहोरात्र बातमी प्रसारणाचे काम सुरू आहे. हे सर्व पत्रकार आपले स्वास्थ्य सांभाळून जोखमीचे काम करत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखील प्रसारमाध्यमांतील संबंधित प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांच्या चाचणीसाठी प्रयत्न करावेत, अशी सुचनाही सुभाष देसाई यांनी दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In India: भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 51 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली)

सुभाष देसाई यांनी आज मुंबईमध्ये कोरोना आणि सारी बाधित रुग्णांच्या प्रश्नाबद्दल आरोग्य सचिव व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे संचालक अनुपकुमार, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केली. औरंगाबाद जिल्ह्यातील सारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणी रुग्णालयांची सुरुवात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कोव्हिड केअर सेंटर सोबतच फिव्हर क्लिनिकही कार्यरत होणार असल्याचं सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे.