सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाच्या तपासात आलेल्या ड्रग्ज (Drugs) कनेक्शनवरुन या प्रकरणाला आता वेगळेच रुप प्राप्त झाले आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics Control Bureau) म्हणजेच एनसीबीच्या रडारवर आहेत. याच मुद्द्यावरुन काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलीवुड-सँडलवुड-गोवा ड्रग कनेक्शन या सर्वांची चौकशी एनसीबी का नाही करत? असा सवाल उपस्थित करतानाच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? अशी खोचक टीकाही काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant ) यांनी ही टीका केली आहे. सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत एक व्हिडिओही शेअर केला आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि एनसीबीचा तपास यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सांवत यांनी म्हटले आहे की, भाजपाचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करु देणार नाही. एका 59 ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करत असताना याचवेळी कर्नाटकमध्ये भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला 1200 किलो गांजासह अटक करण्यात आली याकडे त्यांनी ढुंकुंनही पाहिले नाही. (हेही वाचा, Congress On BJP Over Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह प्रकरणाचा तपास एनसीबीने सोडून दिला आहे का? काँग्रेसचा सवाल 'भाजपचे षडयंत्र उघडकीस' आल्याची टीका)
सचिन सावंत यांनी म्हटले आहे, कर्नाटकात अभिनेत्री रागिनी द्विवेदी हीला सँडलवूड ड्रग रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपाची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. अल्वा हा गुजरात भाजपाचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे आणि विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीपसिंहबरोबर सहनिर्माता आहे आणि मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे. विवेक हा संदीपसिंहच्या निर्मिती कंपनीत भागीदार आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.
सचिन सावंत ट्विट (व्हिडिो)
एनसीबी आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाली आहे का? pic.twitter.com/Rk2vdRxUYp
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 24, 2020
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पुढे म्हटले आहे की, गुजरात राज्य सरकारने संदीप व विवेकच्या कंपनीबरोबर 177 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला. या मोदी बायोपीकचे पोस्टर रिलीज हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास उपस्थितीत करण्यात आले होते. याच संदीपसिंहने भाजपा कार्यालयात 53 वेळा फोन कोणाला केले होते आणि संदिपसिंहला मॉरिशसमध्ये एका प्रकरणात कोणी मदत केली होती याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हे सर्व एकमेकाशी संबंधीत आहे. महाराष्ट्र सरकारने या संबंधाची माहिती सीबीआयला दिलेली आहे. परंतु आजपर्यंत या अँगलचा तपास का केला नाही, याचे आश्चर्य आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.