Congress on Asaduddin Owaisi: काँग्रेस नेत्यांकडून असदुद्दीन ओवैसी यांना प्रत्युत्तर 'MIMचे दोन आमदार 5 वर्षे गप्प का'
Congress | (Photo Credits: Facebook)

मुंबईच्या चांदीवली येथील सभेत मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) आणि राजकीय सेक्यॅल्युरमवरुन काँग्रस पक्षावर जोरदार टीका करणाऱ्या एआयएमआयएम (AIMIM ) नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना महाराष्ट्र काँग्रेस (Congress) नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस मुस्लिमांच्या हक्कासाठी संघर्ष करत होती तेव्हा हे लोक कुठे होते? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने विचारला आहे. माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ मोहम्मद नसीम खान (Naseem Khan) यांनी म्हटले की, काँग्रेस जेव्हा मुस्लिम आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष करत होता तेव्हा, एमआयएम पक्षाचे दोन आमदार विधानसभेत होते. तेव्हा मात्र त्या आमदारांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात सरकारला एकही प्रश्न का विचारला नाही, असा सवालही नसीम खान यांनी विचारला आहे.

नसीम खान यांनी ते अल्पसंख्याकमंत्री असताना केलेल्या कामाचा दाखला देत सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात मराठा आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजाला आरक्षण मिळाले. आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची पुढील भाजप सरकारने अंमलबजावणी केली नाही. ही अंमलबजावणी व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष सलग पाच वर्षे संघर्ष करत होता. मात्र, एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी एकदाही याबाबत विधिमंडळात आवाज उठवला नाही. निवडणुका आल्या की लगेच एमआयएमला मुस्लिम आरक्षण, मुस्लिम हित आठवते. एकदा का निवडणुका संपल्या की पुन्हा हा मुद्दा त्यांच्या विस्मरणात जातो. भाजप व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही नसीम खान यांनी म्हटले. (हेही वाचा, AIMIM Rally In Mumbai: राजकीय सेक्युलॅरिजमुळे देशातील मुस्लिमांचे सर्वाधिक नुकसान- असदुद्दीन ओवैसी)

काँग्रेस पक्ष हा मुस्लिमाच्या कल्याणासाठी नेहमीच आग्रही राहिला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा देतानाच हिंदू-मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करणाऱ्या भाजपला एमआयएम नेहमी साथ देत असल्याची टीकाही नसीम खान यांनी केली. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशभरात भाजपला अनुकुल अशीच भूमिका एमआयएमने घेतल्याचे अनेकदा दिसून आल्याचेही ते म्हणाले.