महाराष्ट्रातील 41 मंत्री कोट्याधीश तर काँग्रेस नेते विश्वजित कदम आहेत 216 कोटी संपत्ती चे मालक, असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म चा रिपोर्ट
Vishwajeet Kadam (Photo Credits:: Wikimedia Commons)

एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे मात्र जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी अशी अवस्था महाराष्ट्रात निर्माण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्मच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील 42 मंत्र्यापैकी 41 मंत्री कोट्याधीश असल्याचे खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर यातील काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे या यादीत सर्वात धनाढ्य मंत्री असल्याचाही उल्लेख यात करण्यात आला आहे. विश्वजीत कदम 216 कोटी संपत्तीचे मालक आहेत.

असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्मच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्याच्या मालमत्तेबाबत खुलासा करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये मंत्र्यांची इतर माहितीच्या व्यतिरिक्त वित्तीय तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतही माहिती देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- तुकडे तुकडे गँग संपविण्यासाठी लष्करप्रमुखांना आदेश द्या; शिवसेनेचे मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान

विश्वजीत कदम यांच्याकडे 216 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे 75 कोटींची तर राष्ट्रवादीचेच नेते राजेश टोपे यांच्याकडे 53 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोट्याधीश आहेत की नाही हे समजू शकले नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक न लढल्यामुळे त्यांच्या मालमत्तेबाबत विश्लेषकांकडे माहिती उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्यांदा निवडून आलेल्या एकमेव आमदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे कोट्याधीश नाहीत. अदिती तटकरे यांच्याकडे 39 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील मंत्र्याच्या वार्षिक उत्पन्नाबाबतही खुलासा करण्यात आला आहे. अजित पवार यांचे उत्पन्न 3 कोटी 86 लाख आहे. तर अमित देशमुख यांचे 3 कोटी 26 लाख आणि विश्वजीत कदम यांचे 2 कोटी 35 लाख रुपये उत्पन्न आहे.