भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु, काँग्रेस नेत्याने 'सामना' कार्यालयात घेतली शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट
Congress, Shiv Sena | (Photo Credit: Archived, edited, representative images)

 

जनादेश भाजप-शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या बाजूने आहे. त्यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे. विरोधात बसण्यासाठी आम्हाला मिळालेला जनादेश आम्हाला मान्य आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगिले आहे. असे असले तरी काँग्रेस (Congress) नेते हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी दै. सामना (Saamana) कार्यालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. दलवाई यांच्या वक्तव्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.

संजय राऊत यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हुसेन दलवाई म्हणाले, भाजपला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. भाजपने राज्यात शेती, शेतकरी, राज्याचे अर्थकारण, शिक्षणव्यवस्थेची वाट लावली. शेतकऱ्यांची अवस्थाही अत्यंत बिकट झाली आहे, असा आरोप हुसेन दलवाई यांनी केला. दरम्यान, आमचे हायकमांड शिवसेनेसोबत चर्चा करत आहे. मात्र, त्याबाबत सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी निर्णय घ्यावा. परंतू, महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये असे आम्ही म्हणतो आहोत यात बराच मोठा अर्थ आहे, असे दलवाई म्हणले. महाराष्ट्रात आम्ही राष्ट्रपती राजवाट येऊ देणार नाही, असेही दलवाई यांनी सांगितले. (हेही वाचा, महाराष्ट्रात राजकीय पेच प्रसंगावर शरद पवार यांचं मोठं विधान- शिवसेना -भाजपानं लवकर सरकार स्थापन करावं)

दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्या हिंदूत्वात जमीन-आस्मानचा फरक आहे. भाजच्या हिंदुत्वामुळे देशात दर्मांधतेचे वातावरण आणलं गेलं. त्याउलट शिवसेनेचं राजकारण हे भाजपपेक्षा कितीतरी वेगळं आहे, असं सांगत शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस तयार असल्याचे अप्रत्यक्ष संकेतच दलवाई यांनी दिले आहेत.