भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मंगळवारी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तावडेंच्या या भेटीची खिल्ली उडवली आहे.
विनोद तावडे हे राज्यपालांशी सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी नाही तर, तिकिट का कापलं? हे विचारण्यासाठी गेले असावेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. (वाचा - महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता; थोड्याच वेळात जाहीर करणार राष्ट्रवादीची भूमिका)
मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील राजभवन येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती राज्यपालांना दिली. त्या अगोदर तावडेंनी राज्यपालांची भेट घेतली होती. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी तावडेंनी राज्यपालांची भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या भेटीवर अजित पवार यांनीदेखील तावडेंना चांगलाच टोला लगावला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय पेच प्रसंगावर शरद पवार यांचं मोठं विधान- शिवसेना -भाजपानं लवकर सरकार स्थापन करावं
माझ्या माहितीप्रमाणे तावडे आता सध्याच्या विधानसभेचे सदस्यही नाहीत. तावडे प्रमुख नेता कोण होणार यावर मतही देऊ शकत नाही. त्यामुळे तावडे राज्यपालांसोबत काय चर्चा करणार. एकवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे आले असते. तर त्यांनी चर्चा तरी केली असती. कदाचित तावडे राज्यपालांना माझं तिकीट का कापलं? हे विचारायला आले असतील, अशी कोपरखळी मारली आहे.