काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर; मदत व पुनर्वसन खात्याचा स्वीकारला पदभार
Vijay Namdevrao Wadettiwar | (Photo credit : facebook)

काँग्रेसला कॅबिनेट मंत्री विजय वेडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मध्यस्थीमुळे वडेट्टीवारांची नाराजी दूर झाली आहे. वडेट्टीवार यांना मदत व पुनर्वसन खातं (Rehabilitation Ministry) देण्यात आलं आहे. त्यांनी आज या खात्याचा पदभारही स्वीकारला आहे. वडेट्टीवार यांना दुय्यम दर्जाचे खाते देण्यात आल्याने ते गेल्या 5 दिवसांपासून नाराज होते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली होती. त्यामुळे वडेट्टीवार नाराज होते. परंतु, आता मदत व पुनर्वसन खातं मिळाल्याने त्यांची नाराजी दूर झाली आहे. (हेही वाचा - देशात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्येत वाढ: राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून 2018 मधील आकडेवारी जाहीर; पहा धक्कादायक वास्तव)

आज मदत व पुनर्वसन खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, 'मला माझ्या मंत्रीपदाचा उपयोग राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी करता यावा, अशी माझी इच्छा होती. माझी पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नव्हती. परंतु, आता मी समाधानी आहे,' असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करून वडेट्टीवार यांची नाराजी दूर केली आहे.