Photo Credit -X

Nana Patole: लोकसभा निवडणुक 2024मध्ये (Lok Sabha Election)काँग्रेसने घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता राज्यात काँग्रेस (Congress)आणखी सक्रीय होताना दिसत आहेत. काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत. एक खासदार म्हणून हिणवल्या गेलेल्या काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांच्यासह 14 खासदार निवडून आणले आणि सर्वात मोठा पक्ष होण्याची किमया केली. लोकसभेतील या मोठ्या विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने विधानसभेची (Vidhan Sabha)तयारी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची मोठी घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (हेही वाचा: Maharashtra Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून रमेश किर यांना उमेदवारी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण)

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी करावी लागेल. आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवण्याच्या विचारात आहे. लोकसभेत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी साडे तीन महिने गेले. विधानसभेत हे टाळावे लागेल. त्यासाठी महिन्याभरात जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करावा लागेल. म्हणूनच आत्तापासूनच तयारी करावी लागेल, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटीलही आमच्यासोबत येतील. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा फायदा झाला. या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले. आम्ही हाच उत्साह घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरु, असे नाना पटोले म्हणाले.

तसेच लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फॅक्टरचा प्रभाव नव्हता. तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचाही फारसा प्रभाव जाणवला नाही. गेल्या निवडणुकीत आम्ही वंचितमुळे ९ जागा हरलो होतो. मात्र या निवडणुकीत त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. असा दावाही यावेळी नाना पटोले यांनी केला.