Photo Credit - File Photo

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, त्याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. सध्या संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक वेळेला आघाडी धर्म पाळत असताना काँग्रेसचे चिन्ह नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी फारसे खुश नसायचे. परंतु आता मात्र काँग्रेस पक्षाच्या पारंपारिक निशाणीवरती ही निवडणूक होणार असल्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि हितचिंतक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. (हेही वाचा:Maharashtra Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधर च्या निवडणूक रिंगणात मनसेचे अभिजीत पानसे; निरंजन डावखरेंचा पत्ता कट? )

काल मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदार संघ, नाशिक शिक्षक मतदार संघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील चार जागांसाठी 26 जून रोजी निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाचे रमेश कीर यांनी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पोस्ट पाहा-

कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ काँग्रेस नेते आबा दळवी, राजेश शर्मा, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील उपस्थित होते. या निवडणुकीसाठी 31 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. 7 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जून आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी 10 जून रोजी केली जाईल. 31 मे पर्यंत ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या अर्जांची मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे. 7 जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.