Abhijit Panse and Niranjan Davkhare | X

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election) 4 जागांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये कोकण पदवीधर साठी मनसे कडून अभिजित पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत. मात्र अभिजित पानसे यांची उमेदवारी मनसे कडून आहे की महायुती कडून हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. दरम्यान शिंदे गटाकडूनही या विधानपरिषदेसाठी प्रयत्न सुरू असून महायुती कडून ही जागा असल्यास भाजपाच्या निरंजन डावखरेंचा पत्ता कट होण्याची चर्चा रंगली आहे. विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी आहे.

अभिजीत पानसे हे मनसेचे नेते आणि सोबतच सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी 'रेगे', बाळासाहेब ठाकरे यांचे आयुष्य रुपेरी पडद्यावर साकारलेल्या 'ठाकरे' या सिनेमाचं दिग्दर्शन केले होते. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असणार्‍या अभिजित पानसे यांनी शिवसेनेत असताना भारतीय विद्यर्थी सेनेची धुरा देखील सांभाळली आहे. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं विलीनीकरण युवासेनेत झालं आणि अभिजीत पानसे शिवसेनेतून मनसे मध्ये दाखल झाले. अभिजित पानसे 2014 च्या लोकसभा निवडणूकीतही उतरले होते.

भाजपाचे निरंजन डावखरे हे यापूर्वी दोनदा विधान परिषदेमधून आमदार झाले आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळेस महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मग आता विधान परिषद निवडणूकीच्या या रिंगणात महायुती चा म्हणून अभिजित पानसेंना भाजपा पाठिंबा देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. (हेही वाचा, Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर, 26 होणार जूनला मतदान).

दरम्यान  मुंबई आणि कोकण विभागात पदवीधर तर नाशिक आणि मुंबईसाठी शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. यामध्ये ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधर साठी अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर  मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. शिंदे गटाकडून मुंबई पदवीधर साठी डॉ. दीपक सावंत इच्छूक आहेत.