महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
CM Uddhav Thackeray | (Photo Credits-Twitter)

‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील 58 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता 5 ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 14 पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. (हेही वाचा - Bihar Assembly Election 2020: देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता)

या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे नमूद केले आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.