Photo Credits: | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

गर्भधारणा टाळण्यासाठी, लैंगिक स्वच्छतेसाठी तसेच अनेक गुप्तरोगांपासून बचाव करण्यासाठी कंडोमचा (Condom) सर्रास वापर होतो. आजकाल सरकारदेखील विविध मार्गांनी कंडोमच्या वापराबाबत जनजागृती करत आहे. अशात आता महाराष्ट्रातील एक शहर ‘कंडोम हब’ म्हणून उदयास येत आहे.

राज्यातील औरंगाबादने औद्योगिक क्षेत्रात 'ऑटो हब' (Condom Hub) म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. बजाज, स्कोडा, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीजसारख्या बड्या कंपन्यांसह औरंगाबादमध्ये एकूण चार हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे वाहन निर्मितीमध्ये शहराची खास ओळख आहे. त्यात आता औरंगाबादमधील कंडोम उत्पादन उद्योगदेखील भरभराटीला येत आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, औरंगाबाद शहरातून जगभरातील 36 देशांना गर्भनिरोधकांचा पुरवठा केला जात आहे. भारतातील दहा कंडोम उत्पादन कारखान्यांपैकी सहा औरंगाबादेत आहेत. कंडोम हे प्रामुख्याने नैसर्गिक रबर, प्राण्यांच्या त्वचा किंवा इतर अवयव किंवा कृत्रिम पॉलियुरेथीनपासून बनवले जातात. औरंगाबादमध्ये कंडोम बनवण्यासाठी लागणारे रबर हा केरळ आणि तामिळनाडू राज्यातून आयात केला जातो. या राबरावर पुढे प्रक्रिया करून इथे महिन्याला साधारण 100 मिलिअन नग उत्पादित केले जातात.

इथल्या कंडोम इंडस्ट्रीमुळे वर्षाला कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असून, त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. या ठिकाणी तयार झालेले कंडोम प्रामुख्याने युरोप, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि काही आशियाई देशांना पुरवले जातात. म्हत्वाचे म्हणजे देशातील अनेक महत्वाच्या आणि लोकप्रिय ब्रँडच्या कंडोमचे उत्पादन औरंगाबादमध्ये होते. या ठिकाणी साधारण 40 ते 50 फ्लेवरचे कंडोम तयार केले जातात. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा कंडोम ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेमंड ग्रुपच्या कामसूत्र कंडोमची निर्मितीही औरंगाबादमध्ये केली जाते. (हेही वाचा: पीएलआय योजनेअंतर्गत 84 कंपन्यांना 5 वर्षांत एकूण 67,000 कोटी गुंतवणूक वचनबद्धतेसह मान्यता)

दरम्यान, याआधी झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आले होते की, संपूर्ण देशात केरळमध्ये सर्वाधिक कंडोम विकत घेतले जातात. फेब्रुवारीमधील व्हॅलेंटा डेजच्या कालावधीमध्ये भारतीय कंडोमची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात असेही समोर आले आहे. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान रशियामध्ये अचानक कंडोमची मागणी प्रचंड वाढली होती. भविष्यात कंडोमच्या किमती वाढण्याची भीती आणि पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे निर्माण झालेल्या टंचाईमुळे कंडोमच्या विक्रीत अचानक वाढ झाली आहे.