Mumbai: लोकल ट्रेनमध्ये कॉलेज तरुणीचा विनयभंग; चेंबूर येथील आरोपीला अटक
Arrested | (File Image)

Mumbai: दोन महाविद्यालयीन तरुणींचा पाठलाग करून त्यांच्यापैकी एकीचा विनयभंग केल्याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. प्रितेश मनसुखभाई टेलर असे आरोपीचे नाव असून तो चेंबूरचा रहिवासी आहे. कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथील 17 वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी जात होती. यावेळी आरोपीने मुलीचा विनयभंग केला.

दुपारी 12.15 च्या सुमारास घाटकोपरला पोहोचल्यावर आरोपी ट्रेनमध्ये चढला आणि दोघींकडे तोंड करून बसला. यावेळी आरोपीने एका मुलीला अयोग्यरित्या आपल्या पायाने स्पर्श केला आणि अश्लील हावभाव केले. मुलींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्या दादर स्टेशनवर उतरल्या. पण नंतर तो त्यांचा पाठलाग करू लागला. आरोपी मुलींचा पाठलाग करत कॉलेजच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला. (हेही वाचा - Mumbai Horror: डॉक्टर-डॉक्टर खेळण्याच्या बहाण्याने तरुणाचा 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, गुन्हा दाखल)

प्राप्त माहितीनुसार, मुली परीक्षा संपवून संध्याकाळी 5 च्या सुमारास बाहेर पडल्या. यावेळी आरोपी तिथे थांबलेले पाहून त्यांना धक्काच बसला. त्याने पुन्हा मुलींचा पाठलाग सुरू केला आणि चर्चगेट स्थानकापर्यंत दोघींचा माग काढला. अखेर मुलींनी हिंमत दाखवून ही बाब रेल्वे पोलिसांना कळवली. पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली आणि नंतर हे प्रकरण कुर्ला रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. कारण, आरोपी घाटकोपरहून ट्रेनमध्ये चढला होता.

भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोणत्याही मुलीला किंवा महिलेला अशा प्रकारच्या समस्या आल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी केले आहे.