
भाजपची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाने (BJYM) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) बुक माय शो (BookMyShow) आणि त्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बीजेवायएमचा आरोप आहे की, बुक माय शोने कोल्डप्ले कॉन्सर्टच्या (Coldplay Mumbai Concert 2025) तिकीट विक्रीच्या संदर्भात मनी लाँड्रिंग आणि 500 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हा कार्यक्रम 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आयोजित केला आहे. यामध्ये बुकमाय शो अधिकृत तिकीट भागीदार म्हणून काम करत आहे.
बीजेवायएम सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, ही तिकिटे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जाणार होती, मात्र बुक माय शोने काळाबाजारात गुंतलेल्या एजंट्ससाठी विशेष लिंक्स तयार केल्या, ज्यामुळे त्यांना तिकिटांसाठी वाढीव किमती आकारता आल्या. या प्रकारामुळे अनेक चाहत्यांना आहे त्या किंमतीमध्ये तिकिटे विकत घेता आली नाहीत.
तिवाना पुढे म्हणतात, अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे तिकीट खरेदी करणाऱ्या चाहत्यांना तिकिटे मिळाली नाहीत. विशेष लिंक नसलेल्यांना तिकीट खरेदीमधून पूर्णपणे वगळण्यात आले होते व यामुळे काळा बाजार करणाऱ्यांना तिकिटे विकत घेता आली व आता हे लोक ही तिकिटे जास्त किमती विकत आहेत. या गैरप्रकारामुळे बुकमाय शोला जवळपास 500 कोटी रुपये कमावण्यास मदत झाली आहे. विश्वचषक आणि इंडियन प्रीमियर लीगच्या तिकीट विक्रीदरम्यान अशाच प्रकारच्या समस्यांचा हवाला देत त्यांनी पुढे दावा केला की, ही एक अशीच घटना आहे. (हेही वाचा: Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले मुंबई कॉन्सर्टदरम्यान गगनाला भिडले शहरातील हॉटेल्सचे दर; एका रूमसाठी आकारले जात आहेत 70,000 रुपये)
अहवालानुसार, थर्ड-पार्टी एजंट, www.viagogo.com सारख्या प्लॅटफॉर्मसह, कोल्डप्लेच्या मोठ्या फॅनबेसचा गैरफायदा घेत, 12,500 रुपयांची तिकिटे तब्बल 3 लाख रुपयांना विकत आहेत. तिवाना यांनी EOW ला बुकमायशोच्या संचालक आणि प्रमुख व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांवर तिकीट वितरणातील बेकायदेशीर प्रथा तसेच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याशी संबंधित भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे या आरोपांचे खंडन करताना, बुकमाय शोने म्हटले आहे की, भारतात कोल्डप्लेचे म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर 2025 बाबत, Viagogo आणि Gigsberg सारख्या कोणत्याही तिकीट विक्री/पुनर्विक्री प्लॅटफॉर्मशी त्यांचा कोणताही संबंध नाही. बुकमायशोने सांगितले की, त्यांनी चाहत्यांना अशा घोटाळेबाजांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.