Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले मुंबई कॉन्सर्टदरम्यान गगनाला भिडले शहरातील हॉटेल्सचे दर; एका रूमसाठी आकारले जात आहेत 70,000 रुपये
Coldplay Mumbai Concert 2025: आपल्या गाण्यांनी आणि संगीताने लोकांना वेड लावणारा ब्रिटीश बँड कोल्डप्ले (Coldplay) तब्बल 9 वर्षांनंतर भारतात परफॉर्म करणार आहे. हा बँड 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर पुन्हा एकदा लोकांना त्याच्या गाण्यांवर नाचायला लावण्यासाठी सज्ज झाला आहे. या शोची घोषणा झाल्यापासून चाहते खूप उत्सुक आहेत. शोची तिकिटे आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होऊ लागली आहेत, ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र तिकीटांच्या विक्रीपूर्वीच बुक माय शोची वेबसाइट क्रॅश झाली. या तिकिटांची किंमत 2,500 पासून सुरु होते. अशात शोच्या तारखांच्या आसपास मुंबईमधील हॉटेल्सचे दर गगनाला भिडलेले दिसतात.
फ्री प्रेस जर्नलनुसार, दक्षिण मुंबईतील हॉटेल व्हिक्टोरियाचे 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान 2 प्रौढांसाठी आणि 2 रात्रींसाठी एका खोलीचे दर सध्या 3,960 रुपये आहेत. जेव्हा याची तुलना शोच्या तारखेच्या (जानेवारी 18-19) दरांशी केली, तेव्हा किमती जवळजवळ दुप्पट, 9,450 रुपये होत असल्याचे दिसत आहे. याव्यतिरिक्त, बुकिंग वेबसाइट असा दावा करते की 22 सप्टेंबरपर्यंत हॉटेलमध्ये फक्त 2 खोल्या (जानेवारी 2025 साठी) शिल्लक आहेत.
यासह सांताक्रूझ येथे, विमानतळाजवळ द ओरियन-प्रीमियम अपार्टमेंट येथे 27-29 सप्टेंबर दरम्यान 2 प्रौढांसाठी एका खोलीची किंमत 2 रात्रींसाठी (मूळ किंमत) सुमारे 16,198 रुपये आहे. तीन महिन्यांनंतर, ही किंमत 29,997 रुपये (मूळ किंमत) वर जाते. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी नावांपैकी एक, आयटीसी मराठा सध्या 2 प्रौढांसाठी 2 रात्रीसाठी सुमारे 25,000 रुपये घेत आहे. मात्र 17 ते 19 जानेवारी दरम्यान इथे 70,000 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाईल. अशा प्रकारे शोच्या तारखांच्या आसपास मुंबईतील काही प्रीमियम हॉटेल्सच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते. (हेही वाचा: BookMyShow Crashed? मुंबई मधील Coldplay India 2025 Tickets ची तिकीट बूक होत नसल्याने फॅन्स वैतागले; Netizens ने शेअर केले स्क्रीनशॉर्ट्स)
दरम्यान कोल्डप्ले बँड म्युझिक ऑफ द स्फेअर्स एक जागतिक दौरा करणार आहे, ज्यामध्ये भारताचे नाव देखील समाविष्ट आहे. यापूर्वी 2016 मध्ये मुंबईतील ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये या बँडने परफॉर्म केले होते. आता कोल्डप्लेचे म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर आशियामध्ये 11 जानेवारीपासून अबू धाबीमध्ये सुरू होईल. बँडमध्ये मुख्य गायक ख्रिस मार्टिन, गिटार वादक जॉनी बकलँड, बासवादक बेरीमन आणि ड्रमर विल चॅम्पियन यांचा समावेश आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2024 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

