प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 29 फेब्रुवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली होती. राज्यात केंद्राप्रमाणे 5 दिवसांचा आठवडा करावा,अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे, अर्थातच या निर्णयामुळे जरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नसला तरी सामान्य नागरिकांकडून नाराजीचा सूर ऐकू येत होता. मात्र या बाबीत लक्ष देत, सरकारकडून पाच दिवसांचा आठवडा जाहीर करताना इतर दिवशी कामाचा वेळ वाढवण्यात आला आहे.

पोलीस, अग्निशमन दल, सफाई कामगार यांच्यासह सरकारच्या 'या' कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा नाही, शासनाचा निर्णय जारी

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पाच दिवसीय आठवड्याच्या निर्णयात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यानुसार सकाळी 9.45 वाजता कार्यालये सुरू होणार असून, सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शिपायांसाठी वेगळी कार्यालयीन वेळ आहे. शिपायांना 9.30 वाजता कार्यालयात हजर व्हावे लागणार असून, 6.30 वाजेपर्यंत थांबावे लागणार आहे. याचा अर्थ म्हणजे सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात आली आहे.

दरम्यान या कार्यालयीन वेळेमध्ये 4 जून, 2019 च्या शासन पदरपत्रकानुसार दुपारी 1 ते 2 या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भूत असेल. तसेच औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्याांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत.