CM Eknath Shinde (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या (Ayodhya) येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या निणर्यांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील माध्यमांना दिली. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी त्यांना भरपाई मिळावी, यासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील वातावरण भक्तीभावाने भारावलेले असून श्री राम मंदिराच्या गर्भगृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिराचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. आपल्या दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. तसेच हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत महंतांची भेट घेतली. काल ते शरयू नदीच्या किनारी झालेल्या महाआरतीत सहभागी झाले होते. (हेही वाचा: कपिल सिब्बल यांचा शिंदेंवर निशाणा; म्हणाले, 'पाठीत वार करणारे बाळासाहेबांचा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत')

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्याचे नाते खूप जुने आणि अतुट असे आहे. उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देश हा आस्थेने आणि श्रद्धेने पाहत आहे. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांचे खुल्या मनाने उत्तर प्रदेश वासियांनी उत्साहात स्वागत केल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या. मुख्यमंत्री होण्यापूर्वी अनेक वेळा या परिसरात नियोजनानिमित्ताने आल्याच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच अयोध्या नगरीत आल्यावर इथल्या जनतेने आपलेसे केले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.