बीडमध्ये मतदानाला गालबोट; बोगस मतदार आणल्याच्या आरोपावरून क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये तुफान राडा
Sandeep Kshirsagar And Jaydutta Kshirsagar (Photo Credits: Facebook)

आज, 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) पार पडत आहेत. एकूण 288 विधानसभा मतदारसंघात हे मतदान सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या विधानसभा निवडणुकीचे महत्व फार वाढले आहेत. अशात बीडमध्ये मतदानाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. बोगस मतदार आणले असल्याचा आरोप करत संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. बीड मध्ये संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर अशी लढत पाहायला मिळत आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी मतदानासाठी बोगस मतदार आणले असल्याचा आरोप संदीप यांनी केला आहे. यामुळे काका-पुतण्यामध्ये चांगलीच जुंपली.

बीड शहरातील बालेपीर मधील इंदिरा माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रातील एक व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये संदीप क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते काही मतदारांवर दमदाटी करत असताना दिसून येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कॉलेजचे कर्मचारी बोगस मतदार म्हणून आणले. बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्डाद्वारे हे बोगस मतदार मतदान करत असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. याबाबत संदीप यांनी रीतसर तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाची टीम याबाबत तपास करत आहे.

या घटनेसोबत करमाळा येथे अपक्ष उमेदवारांची पोलिसांशी बाचाबाची होऊन घटनेला हिंसक वळण लागले आहे. दरम्यान, सध्याच्या निवडणुकीमध्ये 235 महिलांसह 3,237 उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात दुसर्‍या टर्मसाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यांना आघाडीकडून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून जोरदार टक्कर असणार आहे. छोट्या मित्रपक्षांच्या उमेदवारांसह 164 विधानसभा जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना 124 जागा लढवत आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने 147 तर राष्ट्रवादीने 121 उमेदवार उभे केले आहेत.