CIDCO Mass Housing Scheme: सिडकोची वर्षे 2024 साठी सामूहिक गृहनिर्माण योजना; नवी मुंबईमधील तळोजा आणि द्रोणागिरी मध्ये उपलब्ध होणार 3,322 सदनिका
CIDCO (संग्रहित संपादित प्रतिमा)

CIDCO Mass Housing Scheme: भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या स्मरणार्थ, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळने (CIDCO) जानेवारी 2024 पासून एक सामूहिक गृहनिर्माण योजना (Mass Housing Scheme) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील तळोजा आणि द्रोणागिरी नोड्समध्ये 3,322 सदनिका मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे नवी मुंबई मेट्रो आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), ज्याला अटल सेतू देखील म्हणतात, या भागामध्ये लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

याबाबत सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर म्हणाले की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने सामूहिक गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. योजनेंतर्गत तळोजा आणि द्रोणागिरी नोड्समध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि सामान्य श्रेणीतील लोकांसाठी सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सॅटेलाइट सिटीमध्ये घर घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.'

विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांना घरे देण्यासाठी सिडको सातत्याने गृहनिर्माण योजना राबवते. परवडणारी किंमत, दर्जेदार बांधकाम, आधुनिक सुविधांनी सुसज्ज, नवी मुंबईच्या विकसित नोड्समध्ये असलेले गृहनिर्माण संकुल यासारख्या वैशिष्ट्यांमुळे संस्थेच्या सर्व गृहनिर्माण योजना आजपर्यंत लोकप्रिय ठरल्या आहेत.

आताच्या या सामुहिक गृहनिर्माण योजना- 2024 शी संबंधित सर्व प्रक्रिया, नोंदणी आणि अर्जापासून ते सोडतीपर्यंत सर्व प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे. या योजनेसाठी 26 जानेवारी 2024 पासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. योजनेची संगणकीकृत लॉटरी 19 एप्रिल 2024 रोजी काढली जाईल. (हेही वाचा: Resident Doctors Strike Called Off: राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे; सरकारकडून विद्यावेतनात 10 हजार रुपयांची वाढ, वसतिगृहांची तातडीने होणार दुरुस्ती)

यातील 3,322 सदनिकांपैकी 61 द्रोणागिरी आणि 251 तळोजा येथे प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध करून देण्यात येतील, तर 3,010 पैकी द्रोणागिरीमध्ये 374 आणि तळोजा येथे 2,636 सदनिका सर्वसाधारण वर्गासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज आणि योजनेच्या तपशीलवार माहितीसाठी, लोक https://lottery.cidcoindia.com ला भेट देऊ शकतात, तसेच बुकिंग सहाय्यासाठी लोक 7065454454 वर कॉल करू शकतात.