Mumbai Local | (File Image)

तीन दिवसांपासून जंबो मेगा ब्लॉकमुळे विस्कळीत असलेली मध्य रेल्वेची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच ठाणे स्थानकात सुरू असलेली इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि प्लॅटफॉर्म रुंदीकरणाची काम पूर्ण झाली असून अप आणि डाउन लाईनवरील धीम्या आणि जलद लोकलची वाहतूक सुरू झाली आहे. वासी संघटना आणि राजकीय पक्षांनी ऐनवेळी घोषणा करून जम्बोब्लॉक घेण्यास विरोध केल्यानंतरही मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने 36 तासांचा ब्लॉक घेतला होता. (हेही वाचा - Thane Station वर मध्य रेल्वे कडून वेळे आधीच पूर्ण; रूंदीकरण केलेल्या फलाट क्रमांक 5 वर EMU ची ट्रायल देखील यशस्वी (Watch Video))

मध्य रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर तब्बल 99 तास, ठाणे रेल्वे स्थानकावर 63 तास आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीत 930 लोकल फेऱ्या आणि 72 मेल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.

रेल्वे स्थानकातील गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही रेल्वे स्टेशनवर गर्दीतर वाढलीच पण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरही ताण आला होता. गुरुवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात जम्बो मेगाब्लॉक सुरू करण्यात आला होता, आता या मेगाब्लॉकचं काम पूर्ण झालं आहे. आज दुपारी साडेतीनची वेळ दिली असतानाही, काम लवकर पूर्ण झाल्याने मेगाब्लॉक लवकर संपवण्यात आला आहे. रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या वेगवान कामामुळे हे काम वेळेआधीच पूर्ण झालं.