अनेकदा रेल्वे स्थानकावर लावलेल्या इंडिकेटर मध्ये दाखवल्या जाणाऱ्या ट्रेनच्या अपेक्षित वेळेत आणि प्रत्यक्ष वेळेत जमीन आस्मानाचा फरक असतो, काही वेळेस हा फरक प्रवासी सुद्धा हसण्यावारी घेतात मात्र कित्येकदा यामुळे खरोखरच तारंबळ उडते. ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवाशांसाठी एक नामी उपाय आणला आहे. यापुढे प्रवाशांना मध्य रेल्वेच्या 'रियल टाइम मोबाइल अॅप' (Real Time Mobile Application) या सुविधेतून आपल्या मोबाइलमध्येच लोकलच्या अचूक अपेक्षित वेळेची माहिती करून घेता येणार आहे. या सुविधेवर अद्याप काम सुरु असून 15 ऑगस्टला हे ऍप अधिकृतरीत्या कार्यन्वित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा -Google Maps वर समजणार ट्रेन, बसमधील गर्दीचा अहवाल, जागा तपासून करा आपला प्रवास प्लॅन
मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनिल कुमार जैन यांनी उपनगरी गाडय़ांत जीपीएस यंत्रणा बसवून प्रवाशांना मोबाइलवर अचूक माहिती देण्याची ही योजना असल्याचे सांगितले. त्यानुसार हे अॅप विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे गाडी विलंबाने धावत असल्यास त्याप्रमाणे प्रवाशांना पुढील नियोजन करता येणे शक्य होईल. याशिवाय 30 सप्टेंबरपासून प्रवाशांना प्रवासातच ‘कंटेन्ट ऑन डिमांड’ या सुविधेअंतर्गत हॉटस्पॉट वायफायमार्फत गाणी, मालिका किंवा तत्सम मनोरंजन सुविधा देण्याचेही ठरविण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले.