राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा हटवण्याआधी केंद्र सरकारकडून (central government) कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असे सांगण्यात येत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला असून पक्षाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता सुरक्षा काढली. अजून किती नीच पातळी गाठणार? असे म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सुरक्षेसाठई दिल्ली पोलिसांचे 3 आणि सीआरपीएफचे 3 जवान तैनात करण्यात आले होते. मात्र, 20 जानेवारीपासून ही सुरक्षा हटवण्यात आली असून सुरक्षा काढण्याआधी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे. यावरुन धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली... किती नीच पातळी गाठणार? अहो, ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचे कवच आहे, त्याला भय कुणाचे... केंद्र सरकारच्या संकुचित, कोत्या मनाचा निषेध! अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Bandh: 'वंचित' ने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला जाणीवपूर्वक हिंसक वळण देण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर
धनंजय मुंडे यांचे ट्विट-
याआधी केंद्र सरकारकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर केंद्र सरकारने जाणुनबुजून सुरक्षा हटवली असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्याही एसपीजी सुरक्षेत बदल करण्यात आला होता.