महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी व्यंगचित्र कलेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजप आणि पंतप्रधान मोदी समर्थकांनी राज ठाकरे यांना व्यंगचित्राच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. हे व्यंगचित्र (Cartoon ) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (Viral on social media) ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ या फेसबुक पेजवर ते पोष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची राज ठाकरे यांनी पुणे येथे मुलाखत घेतली होती. या मुलाखतीवर आधारीत हे व्यंगचित्र आहे. दरम्यान, या व्यंगचित्रावर व्यंगचित्रकाराची स्वाक्षरी नाही. त्यामुळे हे व्यंगचित्र कोणी काढले याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, हे चित्र भाजपसमर्थकांनीच रेखाटले असावे असा अंदाज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना राज ठाकरे यांनीही व्यंगचित्राच्या माध्यमातून हल्ला चढवला होता. पंतप्रधान हे स्वयंप्रतिमेत अडकले आहेत. ते स्वत:चेच कौतुक स्वत: करुन घेतात. ते त्यांना हवे तेव्हा हव्या त्याच प्रसारमाध्यमाला आणि माध्यमसंस्थेला मुलाखत देतात. त्यांच्या मुलाखतीचे प्रश्नही आगोदरच ठरलेलेल असतात. एकूणच काय तर, त्यांची मुलाखत आगोदरच फिक्स केलेली असते, अशा आशयाचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले होते. हे व्यंगचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवर आधारीत होते.
राज ठाकरे यांची व्यंगचित्रे ही अनेक अर्थाने खोचक असतात. तसेच, त्यातील राजकीय अर्थही अनेक निघतात. त्यामुळे ही व्यंगचित्रे सोशल मीडियावरही व्हायरल होतात. गेल्या काही काळात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून हल्ल्याची मालिकाच सुरु केली आहे. राज यांनी दिवाळी तसेच, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा आणि छत्तीसगढ या पाच राज्यांमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काढलेली व्यंगचित्रेही जोरदार गाजली होती. (हेही वाचा, मोदींच्या मुलाखतीवर राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून फटकारे)
दरम्यान, ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांची प्रतिमा एका पोपटाच्या रुपात दर्शविण्यात आली आहे. त्या पोपटाचे बोलघेवडा पोपट असे नामकरणही करण्यात आले आहे. शरद पवार आणि राज ठाकरे खुर्चीत आमनेसामने बसले आहेत. राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेत आहेत. दरम्यान, साहेब बोला काय विचारू? असे राज ठाकरे यांनी विचारताच, पाळीव पत्रकारांनी सेट करून दिलेले मोदी विरोधी प्रश्नच विचारा उत्तर तयार आहे असे उद्गार पवार यांच्या तोंडी टाकण्यात आले आहेत. बाजूला बारामतीच्या पोपटाने घेतलेल्या मुलाखतीत बारामतीच्या साहेबांनी मोदींवर पुन्हा टीका केली अशा बातमीचा मथळा झळकतो आहे. तर, ' क्रोध मोदींच्या यशाचा' असे शिर्षकही व्यंगचित्राला दिले आहे. व्यंगचित्राती खोचक टोला असा की, एका मोडक्या पुलावरुन रेल्वे जाते आहे आणि पुढे ती कोसळत आहे. त्यावर राजाला साथ द्या या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. यातून मनसेचे निवडणूक चिन्ह इंजिनावर निशाणा साधण्यात आला आहे. अर्थात हे व्यंगचित्र राज ठाकरे यांच्या मुळी चित्राची नक्कल आहे. पण, त्यात बरेच बदल करण्यात आले आहेत. या चित्राला 'एक सेटिंगवाली मुलाखत असेही शीर्षक' शिर्षकानेही संबोधन्यात आले आहे.