Buldana: विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पती, सासू-सासऱ्यांसह 9 जणांविरुद्ध गुन्हा; बुलढाणा जिल्ह्यातील घटना
Arrested

विहिरीत पाय घसरुन पडल्याने सुनेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगणाऱ्या सासरकडील मंडळींचा बनाव उघड झाला आहे. या प्रकरणात विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्यांसह एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शिर्ला नेमाने येथे लक्ष्मी गजानन राठोड या 24 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला होता. सारच्यांनी विहिरीत पडल्याने सुनेचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. मात्र, विवाहितेच्या भावाने पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सारच्यांच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या (Suicide) केली.

हिवरखेड पोलिसांनी भावाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत काही जणांना अटक केली आहे. विवाहिता लक्ष्मी हिच्या भावाने दिलेल्या तक्रारीमध्ये सासरच्या मंडळींपैकी नऊ जणांवर आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मीचा पती, सासू, सासरा, दीर यांच्यासह जावा हे सर्वजण मिळून लक्ष्मीचा छळ करत होते. या छळाला कंटाळून तिने विहिरीत आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, लक्ष्मीचा पती गजानन राठोड, सासरा जानकीराम राठोड, सासू फुलाबाई राठोड , गजाननचे तीन भाऊ , तिघांच्या पत्नी अशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी जानकीराम राठोड आणि गजानन राठोड या दोघा पितापुत्रांना पोलिसांनी अटक केली आहे. (हेही वाचा, Video Call वर कन्येचा चेहरा दाखविण्यास पत्नीचा नकार, पतीची आत्महत्या; बदलापूर येथील घटना)

प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मी ही शेतात कामसाठी गेली होती. या वेळी शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर तिने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली असे तिच्या माहेरच्यांचा दावा आहे. दरम्यान, तिचा पाय घसरुन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा सासरच्यांनी पोलिसांना माहिती देताना केला होता.