Video Call वर कन्येचा चेहरा दाखविण्यास पत्नीचा नकार, पतीची आत्महत्या; बदलापूर येथील घटना
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) शहरात होळी (Holi) सणाच्या दिवशीच एका विवाहीत व्यक्तीने आत्महत्या (Suicide) केली आहे. धक्कादायक म्हणजे व्हिडिओ कॉल केल्यावर पत्नीने आपल्या लेकीचा चेहरा दाखवला नाही. या कारणावरुन संतापलेल्या पतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. पत्नीने केवळ मुलीचा चेहरा न दाखविल्याने झालेल्या मनस्तापातून या व्यक्तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उलल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकाराची परिसरात चर्चा आहे. तर सदर व्यक्तीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

घटनेबाबत माहिती अशी की, राजू जाधव नावाचा एक व्यक्ती आपली पत्नी, दोन महिन्यांची मुलगी आणि आपल्या आईवडीलांसह बदलापूर येथील वडवली परिसरात तलरेजा कॉलेज परिसरात वास्तव्यास होता. पाठिमागील काही दिवसांपासून राजू आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होता. या वादातून पतीपासून वेगळे राहायचे या विचाराने ती माहेरी निघून गेली होती. माहेरी जातानाही दोघांमध्ये वाद झाला होता. (हेही वाचा, Crime: शाळेतील निरोप समारंभ आटोपल्यावर तरुणाचा प्रेमप्रकरणातून 16 वर्षीय विद्यार्थिनीवर चाकूहल्ला, तरुणी गंभीर जखमी)

दरम्यान, पत्नी रागाने माहेरी निघून गेली असली तरी किमान होळी सणाला तरी ती मुलीला घेऊन परत येईल अशी त्याला आपेक्षा होती. परंतू, पत्नी परत आलीच नाही. शिवाय व्हिडिओ कॉलवेळी तिने त्याला लेकीचे तोंडही दाखवले नाही. त्यामुळे व्यथित होऊन त्याने आपण आत्महत्या करत आहोत असे पत्नीला सांगितले आणि घरातील बेडरुमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, पत्नीने पतीने केलेल्या वक्तव्याबाबत शेजाऱ्यांना कळवली. त्यांनी बेडरुमपर्यंत धाव घेतली. मात्र तोपर्यंत पती मृतावस्थेत आढळला होता. बदलापूर पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे.