
Bulbul Cyclone: अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळाची (Maha Cyclone) तीव्रता कमी झाली आहे. मात्र, आग्नेय बंगालच्या उपसागरात 'बुलबुल' चक्रीवादळ (Bulbul Cyclone) तयार झाले आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तसेच कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. आज पुणे शहर आणि परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील. तर, काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. (हेही वाचा - मुंबई,नवी मुंबई मध्ये पावसाचा धुमाकूळ, ट्रान्स हार्बर रेल्वे ठप्प तर मध्य रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने!)
स्कायमेट ट्विट -
हवामान अंदाज 8 नोव्हेंबर: चक्रीवादळ बुलबुलमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस अपेक्षित: #Marathi #Maharashtra #CycloneBulbul https://t.co/eCdxuMTTkt
— SkymetWeather (@SkymetWeather) November 7, 2019
दरम्यान, आज मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. वांद्रे, खार, सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तसेच सायन, वडाळा परिसरातही पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे तांत्रिकी बिघाडामुळे मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरील लोकल फेर्यांचे वेळापत्रक कोलमडलं आहे.
हेही वाचा - Mumbai Rains: मुंबई शहर, उपनगरासह नवी मुंबईत जोरदार पाऊस; सखल भागात पाणीच पाणी
मुंबईमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक तांत्रिक कारणामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेकांचा रेल्वेतच खोळंबा झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, स्पार्क झाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आली आहे. तर पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वे सेवा सुरू होणार नसल्याच्याही घोषणा रेल्वे स्थानकांमध्ये करण्यात आल्या आहेत. 'बुलबुल' चक्रीवादळामुळे पुढील 48 तास महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.