Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Mumbai Rains and Rail Service Updates:  मुंबईमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पावसाने सार्‍यांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे. अशातच तांत्रिकी बिघाडामुळे मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरील लोकल फेर्‍यांचे वेळापत्रक कोलमडलं आहे. मुंबईमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक तांत्रिक कारणामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेकांचा रेल्वेतच खोळंबा झाला आहे. प्राप्त माहितीनुसार स्पार्क झाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आली आहे. तर पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वे सेवा सुरू होणार नसल्याच्याही घोषणा रेल्वे स्थानकांमध्ये करण्यात आल्या आहेत.

दरम्यान नवी मुंबईत रबाळे मध्ये जोरदार पावसासोबत गडगडाट होत असल्याने प्रवासांचा मोठा खोळंबा झाला आहे. आज सकाळी मध्य रेल्वेच्या माटूंगा स्थानकामध्येही रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक कोलमडली होती. मात्र प्रसाशानाकडून बिघाड दुरूस्त करण्याचे सांगण्यात आले आहे. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने धावत आहे.

अरबी समुद्रामध्ये 'महा' आणि बंगालच्या उपसागरामध्ये 'बुलबुल' चक्रीवादळ घोंघावत असल्याने वातावरणामध्ये बदल झाले आहेत. हवामान खात्याने पुढील 48 तास महाराष्ट्रामध्येही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.