Pune Crime: येरवडा जेलमध्ये पूर्व वैमानस्यातून कैद्याची निर्घृण हत्या, पुण्यात खळबळ
Jail Pixabay

Pune Crime: पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी चार कैद्यांविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या कैद्याचे नाव आहे.  कारागृहातील 'सर्कल २ मधीस बराक १'च्या आवारात हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. कैचीने  अंगावर आणि मानेवर वार करत हत्या करण्यात आली आहे. (हेही वाचा- पुण्यात सोसायटीतील जिमवरून वाद, चौघांमध्ये फ्रिस्टाईल मारामारी, एकाला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पूर्व वैमानस्यातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. अनिकेत समदूर, महेश तुकाराम माने, गणेश हनुमंत मोटे आणि आदित्य संभाजी मुरे अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपी महेश हा विविक गुन्हांमुळे कारागृहात होता. दरोडा, मारामारी, हत्या, चोरी, हत्यार बाळगणे इत्यादी गुन्ह्यामुळे कारागृहात आहे. दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते.

महेश आणि इतर चार आरोपींमध्ये काही वर्षांपूर्वी भांडण झालं होते.याचा राग मनात धरत महेशची हत्या केल्याचे समोर आले आहे. कारागृहात लपलेल्या कैचीने महेशच्या मानेवर वार करण्यात आले. या घटनेची माहिती कारागृहातील रक्षकांना पोहचताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतले. तो पर्यंत महेश हा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससून रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर कारागृहात खळबळ उडाली.