Drain | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

उघड्या ड्रेनेज चेंबरमध्ये (Open Drainage Chamber) पडून 18 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात घडली आहे. ही घटना घडल्याच्या 12 दिवसांनंतर नारपोली पोलिसांनी (Narpoli Police) भिवंडी निजामपुरा शहर महानगरपालिकेचा (BNCMC) ठेकेदार, उपकंत्राटदार आणि अभियंता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुक्तदीर बुबेरे (कंत्राटदार), प्रवीण सूर्यराव (उप-कंत्राटदार) आणि एक अभियंता अशी आरोपींची नावे आहेत. अभियंत्याचे नाव पोलिसांनी उघड केलेले नाही. प्राप्त माहितीनुसार, 23 ऑक्टोबर रोजी प्रथमेश कमलेश यादव हा 12 वर्षांचा मुलगा घराजवळ खेळत होता. खेळता खेळता हा मुलगा उघड्या नाल्याजवळ गेला असता आत पडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना नापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भिवंडीतील अजमेरनगर परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ही घटना घडली तेव्हा मुलाची आई आणि काका घरी होते. अर्ध्या तासाहून अधिक काळ ते त्यांचा शोध घेत होते. शेजारीही मुलाचा शोध घेण्यास सामील झाले आणि ड्रेनेज चेंबरमध्ये कोणीतरी त्याला दिसले. सर्वांनी जवळ जाऊन पाहिले तर तो या मुलाचा मृतदेह असल्याचे आढळून आले. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले.

नारपोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ म्हणाले, तपासादरम्यान आम्हाला समजले की गटारीचे काम पूर्ण झाले आहे. परंतू, ड्रेनेजचे झाकन उघडेच होते. काही लोक गटारात पडून जखमी झाल्याने स्थानिकांनी याबाबत ठेकेदार आणि सिव्हीक इंजिनीअरकडे तक्रार केली होती. वारंवार तक्रारी व इशारे देऊनही ठेकेदार गटार झाकण्यात अपयशी ठरला. त्यानंतर आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (ए), 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.