मुंबई शहरात येत्या दोन, तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता; महापालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Rainfall in Mumbai | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

मुंबई (Mumbai) आणि उपनगरांमध्ये येत्या दोन ते तीन तासात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेला इशारा पाहून मुंबई महापालिकेने (BMC) आपल्या ट्विटर हँडलवरुन मुंबईकरांना पावसाचा इशारा दिला आहे. महापालिकेने म्हटले आहे की, मुसळधार पावसाची शक्यता विचारात घेता नागरिकांनी सतर्क राहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच, काही मदत अथवा मार्गदर्शन हवे असल्यास 1916 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

मुंबईत पावसाची यंदा विक्रमी नोंद होण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या मोसमातील (जून ते सप्टेंबर) या काळात पडलेल्या पावसाची नोंद ही गेल्या सत्तर वर्षांत पावसाच्या झालेल्या नोंदीच्या अगदी जवळपास पोहोचली आहे. पावसाची दमदार कामगिरी जर अशीच कायम राहिली तर येत्या एक दोन आठवड्यातच गेल्या सत्तर वर्षांतील विक्रमी पाऊस अशी या पावसाची नोंद होऊ शकते. (हेही वाचा, Mumbai Rains, Weather Forecast: मुंबई मध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज)

मुंबई महापालिका ट्विट

दरम्यान, मुंबई शहरासह उर्वरीत महाराष्ट्रातही परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही तासांमध्ये कोकण, पुणे, बीड, कोल्हापूर सांगली आदि ठिकाणी मुसळधार ते हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणावर पुरस्थिती निर्माण झाली. पाणी पातळीत वाढ झाल्याने रस्ते आणि नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यांवर उभ्या केलेली वाहने वाहून गेली. या पुराने सुमारे 10 जणांचे बळी घेतल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. त्यामुळे स्थानिक नदीला पूर आला आहे.