Maharashtra Municipal Corporation Bypoll Results 2020: जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर आज महाराष्ट्र राज्यातील सहा महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या पोटनिवडणूकींचा निकाल जाहीर झाला आहे. आज नागपूर, नाशिक, मुंबई, मालेगाव, पनवेल आणि लातूर महापालिकांच्या पोटनिवडणूकीत मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिसला आहे. काल (9 जानेवारी) दिवशी निवडणूकीचं मतदान पार पडलं तर आज सकाळी 10च्या सुमारास मतामोजणीला सुरूवात झाली. या निकालांमध्ये शिवसेनेने मुंबईतील मानखुर्द आणि नाशिकमध्ये सतपूर प्रभागात विजय मिळवला आहे. इथे पहा निवडणूकांचे लाईव्ह अपडेट्स.
महापालिका पोटनिवडणूक निकाल 2020
-
मुंबई महानगर पालिका
मुंबईत मानखुर्द मधून शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांनी भाज्पा उमेदवारावर दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधून शिवसेनेत विठ्ठल लोकरे यांनी प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विठ्ठल लोकरे यांनी पालिका पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.
-
नाशिक महानगर पालिका
नाशिकमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. नाशिकमध्ये मनपा पोटनिवडणूकीमध्ये प्रभाग 22 मधून महाविकास आघाडीच्या जगदीश पवार यांचा 3388 मतांनी विजय झाला आहे. तर सतपूर प्रभाग 26 अ मधून मधुकर जाधव विजयी झाले आहेत.
-
पनवेल महानगर पालिका
पनवेल महानगर पालिकेमध्ये भाजपा उमेदवार रूचिता लोंढे यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या स्वप्नील कुरघोडे यांच्यावर 3200 मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे.
-
नागपूर महानगर पालिका
नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्हा परिषदेमध्ये नागपूरात धक्कादायक निकाल लागले असले तरीही महानगर पालिकेमध्ये भाजपा उमेदवार विक्रम ग्वालबंशी विजयी झाले आहेत.
-
मालेगाव महापालिका
मालेगाव महापालिकेमध्ये JDS- MIM मध्ये मुश्तकिम डिग्निटी यांना विजय मिळाला आहे.
-
लातूर महापालिका
लातूर महापालिका निवडणूकीमध्ये कॉंग्रेसचे विकास वाघमारे यांचा विजय झाला आहे. 726 मतांनी आघाडी मिळवत त्यांनी निखिल गायकवाड यांच्यावर विजय मिळवला आहे.
महाराष्ट्रात पोटनिवडणूका झालेल्या अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता होती मात्र आज लागलेल्या निकालांमध्ये भाजपाची पिछेहाट झाल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी लागलेल्या जिल्हा परिषद निवडणूकींमध्येही अशाप्रकारे भाजपाला महत्त्वाच्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला होता.