Maharashtra Government Formation: महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून सुरु असणाऱ्या संघर्षाला विराम देण्यासाठी आज राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपाला (BJP) राजभवनावर आमंत्रित केले होते. तत्पूर्वी वर्षा बंगल्यावर भाजपाच्या कोअर कमिटीची एक खास बैठक पार पडली यामध्ये गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपा नेत्यांना मार्गदर्शन केले, या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र सत्ता स्थापनेचा दावा करण्याऐवजी आम्ही "शिवसेना (Shivsena) सोबत नसल्याने सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत" अशी कबुली देत या संघर्षातून पाय मागे घेतला आहे. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे. याशिवाय आम्ही महायुतीला मिळालेल्या जनादेशाचा आदर करतो त्यामुळेच शिवसेने शिवाय सत्ता स्थापन करणे जमणार नाही मात्र शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन करायची असल्यास त्यांना खूप खूप शुभेच्छा असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिलेल्या माहितीनुसार तूर्तास तरी भाजपाने सत्ता स्थापनेच्या संघर्षातून पाय मागे घेतला असून आता संपूर्ण दारोमदार ही शिवसेनवर येऊन ठेपल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे केवळ भाजपाला नाही त्यामुळे सत्ता स्थापन करायचे झाल्यास शिवसेनेने सोबत असणे आवश्यक आहे अशी भूमिका भाजपने मांडली असल्याने आता राज्यापाल हे सर्वाधिक मते मिळवणाऱ्या दुसऱ्या पक्षाला म्हणजेच शिवसेनेला सत्ता स्थापनाच दावा करण्यासाठी कधीही आमंत्रित करू शकतात. यामध्ये शिवसेना 145 जागांचा आकडा सिद्ध करू शकल्यास त्यांना सत्तेचा दावा करता येणार आहे, अन्यथा एकूणच राजकीय संघर्ष हा राष्ट्रपती राजवटीच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तेचा तिढा अजूनही सुटण्याचे संकेत नाहीयेत, अशातच भाजपने वेट अँड वॉच ची भूमिका स्वीकारली आहे तर , राष्ट्रवादी आणि काँग्रेस ने सुद्धा आपण विरोधी पक्षात बसणे हाच जनतेचा कौल असल्याचे म्हणत शिवसेनेसोबत जाण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला आहे. यांनतर आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले आहेत यापुढे आता शिवसेना काय भूमिका घेतेय हे पाहणे महत्वाचे आहे.