Chandrakant Patil on CM Uddhav Thackeray: 'नाचता येईना अंगण वाकडे' म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्याच्या घरुन काम करण्याच्या स्पष्टीकरणावर टीका
Chandrakant Patil And Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (13 सप्टेंबर) बऱ्याच दिवसांनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला. या भाषणात विविध मुद्दांना हात घालत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या ‘घराच्या बाहेर पडा’ या टीकेलाही उत्तर दिले. मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील सर्व परिस्थिती आढावा घेत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्या ठिकाणी तुम्ही पोहचू शकत नाही तिथेही मी जाऊन येतो, असे ते म्हणाले. यावरुन टीका करण्याची संधी न सोडता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी 'नाचता येईना अंगण वाकडे' असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे मी पोहोचलो, दुर्गम भागात मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो. मुळात हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केले आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केली. त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुम्ही किती रुग्णालय आणि कोव्हिड सेंटरचे तुम्ही निरक्षण केले? केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचा आढावा घेण्यात कसले समाधान मानता? असे सवालही त्यांनी विचारले आहेत. (CM Uddhav Thackeray Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद; पहा कोविड-19, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले)

Chandrakant Patil Tweet:

"तुम्ही मातोश्री बाहेर न पडल्यामुळे कित्येक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे धैर्य खचले आहे, याची कल्पना आहे का तुम्हाला? हे तुम्हाला कधी कळणार हेच समजत नाही, "असेही पाटील म्हणाले. त्याचबरोबर केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून संवाद साधण्यापेक्षा प्रत्येक्ष घराबाहेर पडताल तर तुम्हाला जनतेचे खरे प्रश्न कळतील, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

पुढे ते म्हणाले की, "राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते राज्यभरातील रुग्णालयांमध्ये प्रवास करत आहेत. रुग्णांचे हाल जाणून घेत आहेत. प्रशासन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनी विश्वास निर्माण करत आहेत. मग मातोश्री मध्ये बसल्या बसल्या किती कोविड सेंटरची परिस्थिती तुम्ही जाणून घेतलीत याचे उत्तर जनतेला द्या. नाचता येईना अंगण वाकडे अशी तुमची परिस्थिती झाली आहे."