Sanjay Raut on BJP: संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना या विषयात भाजपने चोंबडेपणा करु नये- संजय राऊत
Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या विषयावरुन भाजप (BJP) शिवसेनेवर करत असलेली टीका अनाठाई आहे. राज्यसभा उमेदवारी हा संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना यांच्यातील अतर्गत मामला आहे. या विषयात भाजपने चोंबडेपणा करु नये, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला झापले आहे. संभाजीराजे छत्रपती यांची शिवसेना कोंडी करत आहे, अशी टीका भाजपने केली होती. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत बोलत होते. संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यांसी संवाद साधला.

संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी हा विषय शिवसेनेसाठी संपला आहे. असे असले तरी छत्रपतींच्या गादीविषयी आम्हाला असलेले प्रेम, आदर आणि अस्था कायम आहे. त्यात कधीही बदल होणार नाही. राजकारणात पुढे जायचे तर कोणत्या तरी पक्षात जायलाच हवे. देशभरातील जे राजे, महाराजे आहेत. जी राजघराणी आहेत. ती कोणत्या ना कोणत्या पक्षासोबतच आहेत. आम्ही एक पाऊल मागे आलो होतो. त्यामुळे संभाजीराजे यांनीदेखील अशीच भूमिका घ्यावी, असे आम्हाला वाटत होते. पण असो, आता हा विषय आमच्यासाठी संपला आहे, असे संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा - Sanjay Raut On Modi Government: ED आणि CBI च्या कारवाईवर शिवसेना संतप्त; संजय राऊत म्हणाले, 'ना महाराष्ट्र झुकणार, ना शिवसेना घाबरणार')

शिसेनेने संजय पवार यांच्यासारख्या मावळ्याला तिकीट दिले आहे. त्यामुळे केवळ कोल्हापूरच नव्हे तर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. लोकांना वाटते आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देऊन त्यांच्या मनातला निर्णय घेतला आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी निश्चित करताना अनेक सामान्य शिवसैनिकांवर विचार झाला. त्यातूनच संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, असे संजय राऊत म्हणाले.

भाजप केवळ विरोधासाठी विरोध करतो आहे. केवळ टीका करण्यापलीकडे या पक्षाला काहीही काम नाही. सरकारने कोणताही निर्णय घेतला तर त्यावर केवळ टीकाच करायची, असे भाजपचे धोरण असल्याचेही संजय राऊत या वेळी म्हणाले.