Sanjay Raut On Modi Government: ED आणि CBI च्या कारवाईवर शिवसेना संतप्त; संजय राऊत म्हणाले, 'ना महाराष्ट्र झुकणार, ना शिवसेना घाबरणार'
Sanjay Raut (Pic Credit - ANI)

Sanjay Raut On Modi Government: महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या अनेक नेत्यांवर ED आणि CBI च्या कारवाईमुळे शिवसेना (Shiv Sena) संतापली आहे. शिवसेनेने केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकारला राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण करायची आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, 'देशभरातील केंद्रीय तपास यंत्रणेचा टाईमिंग आपल्याला माहीत आहे. पश्चिम बंगाल असो, झारखंड असो वा महाराष्ट्र, निवडणुका आल्या की, कोणत्याही राज्य सरकारमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी ईडी आणि सीबीआय पाठवले जाते. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि शिवसेना घाबरणार नाही. (हेही वाचा -  Anil Deshmukh Money Laundering Case: Sachin Waze माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार; CBI कोर्टाने स्वीकरला अर्ज)

महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. ईडीने परब यांच्या पुणे आणि मुंबईतील सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. शिवसेना नेत्यावर कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ईडीने ही कारवाई केली आहे.

सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. महाविकास आघाडी सहा पैकी 4 जागा निवडून आणणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.