
शिवसेना पक्षामध्ये बंडाळी करत 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली वेगळा गट स्थापन केला आहे. आता आमदारांप्रमाणेच खासदार देखील बंडाळी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. येत्या 18 जुलै दिवशी भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. या निवडणूकीदरम्यान शिवसेनेने एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी मतदान करावं याकरिता काही खासदारांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. त्यामुळे विधानसभेप्रमाणेच आता लोकसभेतही शिवसेना धक्का देणार का? याची उत्सुकता आहे.
दरम्यान भाजपा खासदार रामदास तडस यांनी मीडीयाशी बोलताना 12 शिवसेना खासदार नाराज असल्याचा दावा करत त्यांच्याकडून बंडाळी होऊ शकते असे सांगितले गेले आहे. दरम्यान आज पत्रकार परिषदेमध्ये यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास शिवसेना राज्यसभा खासदार आणि पक्षाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी नकार दिला आहे. पण 'द हिंदू' च्या वृत्तामधूनही शिवसेना खासदार बंडखोरीच्या भूमिकेत असल्याचा दावा केला जात आहे.
शिवसेनेचे शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील शिवसेनेच्या खासदारांनी भाजपबरोबर जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. लोखंडे हे या बाबतीत आज (11जुलै) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेणार आहेत. तर आनंदराव अडसूळ यांनी आपल्या शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आहे.
सध्या लोकसभेत शिवसेना गटनेते विनायक राऊत आहे आणि राऊत सध्या उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याने गटनेताच शिवसेनेविरूद्ध निर्णय घेत असल्याचा जो प्रकार महाराष्ट्र विधानसभेत झाला तसा थेट प्रकार लोकसभेत होण्याचा धोका कमी असल्याचं काहींचं मत आहे.