आमदार अतुल भातखळकर (संग्रहित संपादित प्रतिमा)

अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) कार्यालयावर बीएमसी (BMC) ने हातोडा मारल्यानंतर आता महाराष्ट्रामधील राजकारण चांगलेच तापले आहे. कंगना मुंबईमध्ये येण्यासाठी प्रवासात असताना, बीएमसीने कारवाई करत तिच्या कार्यालयामधील अनधिकृत भाग पाडला. आता बीएमसीच्या या निर्णयावर विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कार्यालयातील काही भाग अवैध आहे, त्यांना 27 जून 2019 रोजी नोटीस देऊनही तो भाग अजून का पाडला नाही असा सवाल उपस्थित केला आहे. यासोबत त्यांनी बीएमसीने पाठवलेल्या नोटिशीची प्रतही जोडली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘महाराष्ट्राच्या परिवहन मंत्री अनिल परब यांना त्यांच्या कार्यालयाच्या अवैध बांधकाम प्रकरणी एक वर्षापूर्वी नोटीस देण्यात आली आहे. ते अनधिकृत कार्यालय अजून का तोडण्यात आले नाही? शिवसेनेचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे असतात काय?’

परब यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे, ‘गांधीनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई येथील इमारत क्रमांक 57 व 58 या दोन इमारतीच्या मध्ये मोकळ्या जागेत बेकायदेशीर बांधकाम केले आहे. ते तात्काळ निष्कासित करण्याबाबत तक्रार आली आहे. या इमारतींच्या च्या मधल्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम करुन, त्यात कार्यालयाच्या नावाचा वापर करुन बेकायेशीर कामाकरीता वापर करीत असल्याने सदरचे अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्कासन करावे.’

अतुल भातखळकर ट्वीट -

पुढे म्हटले आहे, ‘तरी आपणास कळविण्यात येते की, ही नोटीस आपणास प्राप्त झालेल्या दिनांकापासून 10 दिवसांचे आंत सदरचे अनधिकृत बांधकाम काढून, तसा अहवाल या कार्यालयाला सादर करावा. अन्यथा, आपण सदर केलेले अनाधिकृत बांधकाम मंडळातर्फे काढण्यात येईल. तसेच सदरचे बांधकाम काढण्याकरीता लागणारा खर्च व होणारी नुकसान भरपाई आपणाकडून वसूल करण्यात येईल. याची व्यक्तीश: नोंद घ्यावी.’

दरम्यान, कंगना रनौतच्या कार्यालायानंतर तिच्या खार येथील घरावरही बीमएमसीचा हातोडा पडण्याची शक्यता आहे. कंगनाच्या घरावरही बीएमसी कारवाई करण्याची शक्यता आहे. बीएमसीने कंगनाच्या खार परिसरातील फ्लॅटमधील काही भाग पाडण्यासाठी परवानगी मागितली आहे.