ShivSena Dussehra Melava 2021: दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजप नेत्यांची प्रतिक्रीया
Chandrakant Patil And Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

आज झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (ShivSena Dussehra Melava) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत केंद्रीय यंत्रणांचाही समाचार घेतला. विविध मुद्द्यांवरुन विरोधकांवर टीका करत त्यांनी नवहिंदूंपासून हिंदुत्वाला धोका असल्याचे म्हटले आहे. यावर आता भाजप नेत्यांनी आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. पाहुया काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, भाजप नेते अतुल भातखळकर.... (ShivSena Dussehra Melava 2021: नवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका; दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर शाब्दिक हल्ला)

चंद्रकांत पाटील:

दसऱ्याच्या दिवशी लवकर शिमगा आल्याचे वाटून भाजप आणि केंद्राच्या नावाने जितका शिमगा करता येईल तेवढा त्यांनी केला. पंढरपूर आणि डेगरुला उमेदवार बाहेरुन आणावे लागले, असं मुख्यमंत्री म्हणाले. तुमची जरा यादी वाचा अब्दुल सत्तार कुठून आले? भाजपचे खासदार चिंतामण वनगा गेल्यानंतर तुम्ही त्यांचा मुलगा चक्क पळवला. पराभव झाला हा भाग वेगळा. तुम्ही शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार उभे केले. सत्ता आल्याशिवाय विकास करता येत नाही, त्यामुळे अशा गोष्टी कराव्या लागतात. महाराष्ट्रात दोन वादळं आली, अतिवृष्टी झाली, महिलांवर अत्यातार झाला. मोठ्या प्रमाणात समोर येणारं ड्रग्ज प्रकरण अशा विविध मुद्द्यांना मुख्यमंत्री हात घालतील अशी अपेक्षा होती. पण त्यांना त्याचं गांभीर्यच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रविण दरेकर:

भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचा टोकाचा तिरस्कार, तिडीक मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून सातत्याने जाणवत होती. ठाकरी शब्द, ठाकरी बाणा यांच्या पलिकडे जावून वक्तव्य करण्यात आली. यात काही शब्द लायकी काढण्यापर्यंत गेले. संस्कृतपणाचं  एका बाजूला सांगताना अशा प्रकारची वक्तव्य काय सांगतात? हा माझा प्रश्न आहे.

आशिष शेलार:

आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाच्या पुढील वर्षभराच्या कामाची दिशा सांगितली. ठाकरी शब्द नेहमीच शिवसैनिकांना ऊर्जा देत असतात, असं आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर प्रतिक्रीया देताना म्हटलं आहे.

अतुल भातखळकर:

राहुल गांधींची चाकरी स्वीकारल्यापासून हिंदुत्वाशी फारकत घेतली असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. तसंच पक पक पकाक असे कॅप्शन देत त्यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, हिंदुत्वाची शिडी करुन जे वर गेलेले इंग्रजांच्या 'फोडा आणि राज्य करा' अशी नीती अंगिकारत आहेत. त्याला बळी जाऊ नका. सर्व भेद संपवून एकत्र मोळी बांधा आणि कोणाहीपुढे न झुकण्याची हिंमत ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे.