
"मी मुख्यमंत्री आहे असं मला आणि माझ्या तमाम जनतेला कधीच वाटू नये, असं मला वाटतं. पण काहीजण म्हणत होते 'मी पुन्हा येईन' ते आता म्हणत आहेत 'मी गेलोच नाही'," असं म्हणत नामोउल्लेख टाळत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला. शिवसेनाला दिलेलं वचन तुम्ही पाळल असतं तर तुम्ही सत्तेत राहिला असतात, असेही ते पुढे म्हणाले. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात रंगलेल्या दसरा मेळाव्यात (Dussehra Melava) ते बोलत होते. यावेळी त्यांनी 'नवहिंदूंपासून हिंदुत्वाला धोका आहे', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला.
"ठाकरे कुटुंबियांची बदनामी करणं हे अनेकांच्या रोजगार हमीचा काम झालं आहे. पण आमचा आवाज दाबणार कोणी जन्माला आलेला नाही आणि येणार नाही. कोणी अंगावर आलं तर तिथेच ठेचू, तुम्हीही कितीही चिरका पण माझा वाडा चिरेबंद आहे," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. "आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि कोणी अंगावर आलं तर सोडत नाही. अंगावर येण्याची हिंमत असेल तर समोरुन या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून येऊ नका, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.
"पित्याला दिलेल्या वचनातून मी हे पद स्वीकारलं आहे. पुत्रकर्तव्याने मी या क्षेत्रात आलो आहे. मैने तो फकीर हुं, हे विचार आमचे नाहीत," असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींनाही टोला लगावला आहे.
दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण:
दसरा मेळावा - २०२१ https://t.co/FRGcUiJQJx
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) October 15, 2021
दरम्यान, यावेळी त्यांनी मोहन भागवत यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचारही बोलून दाखवले. तसंच तुमच्या शिकवणीतून बाहेर पडलेल्या आणि सत्ता काजीब केलेल्यांना पुन्हा एकदा ही शिकवणी द्या, असंही ते म्हणाले. पुढील महिन्यात महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण होतील. पाडण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु, यश आले नाही. हिंमत असेल तर पाडून दाखवा, असं खुलं आव्हानही त्यांनी यावेळी विरोधकांना केलं. त्याचबरोबर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे कौतुक करत त्यांच्यासारखी न झुकण्याची हिंमत यापुढे आपल्यालाही ठेवावी लागेल, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं.
1992-93 साली झालेल्या दंगलीत शिवसेना प्रमुखांनी दाखवलेल्या हिंमतीचा दाखला देत त्यांनी शिवसैनिकांच्या कार्याचे गुणगान गायले. मात्र आता केवळ तुमच्या पालख्या वाहत नाहीत म्हणून शिवसैनिक भ्रष्ट झाला काय? असा सवालही त्यांनी विचारला.
महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला म्हणून गळा काढाल तर उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा मळा फुलला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिमग्याला जावू न दिल्याने महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणाल तर उत्तर प्रदेश मध्ये अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांना अडवणारे पोलिस भारतरत्न, भारतभूषण आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
"काही लोकांना सत्तेचं व्यसन लागलं आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे स्वत:च्या कुटुंबियांची वाट लागते. पण सत्तेच्या व्यसनामुळे दुसऱ्यांच्या कुटुंबांची वाट लावता," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ड्रग्स प्रकरणी केवळ महाराष्ट्रावर कारवाई केली जाते. मात्र इतर राज्यांमध्येही त्यांचे प्रमाण वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले.
"गांधी आणि सावरकरांवरुन वाद करणाऱ्यांवरही त्यांवी निशाणा साधला. गांधी, सावरकर यांनी देशासाठी काय केलं असं विचारणाऱ्यांनी आपण देशासाठी काय केलं?" असा प्रश्न स्वत:ला विचारावा, असंही ते म्हणाले. तसंच त्यांनी पुढील काळात राज्यात करणाऱ्या कामांची माहितीही त्यांनी भाषणादरम्यान दिली. ती कामे पुढीलप्रमाणे:
# संभाजीनगर- संतपीठ
# रेवस ते रेड्डी समुद्रमार्गाचे चौपदरीकरण
# मुंबई- रंगभूमी दालन
# वरळी- जागतिक दर्जाचे मत्सालय
# धारावी- जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र
#मुंबई- लष्कराचं संग्रालय
"ही जनता हेच माझं शस्त्र, वैभव आणि ऐश्वर्य आहेत. हे सगळ्यांनाच लाभत नाही. हे मला शिवसेनाप्रमुखांनी दिलं आहे. हे मला पुढच्या जन्मीही लाभो. महाराष्ट्रातच मला पुढील जन्म मिळो," अशी इच्छाही त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. दरम्यान, नवरात्रीच्या नऊ दिवसांत रक्तदान करणाऱ्या ठाणेकरांचे कौतुकही त्यांनी यावेळी केलं.