Nilesh Rane & Rohit Pawar (Photo Credits: PTI & Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा कोविड सेंटरमधील डान्स व्हिडिओ काल जोरदार व्हायरल झाला. सैराट सिनेमातील 'झिंगाट' (Zingat ) गाण्यावर ठेका धरत त्यांनी कोविड रुग्णांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. यावर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. 'नाचा, जेवढं नाचायचं तेवढं. 2024 पर्यंत नाचून घ्या', असं म्हणत व्हिडिओ ट्विट करत त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना देखील टीकेचे लक्ष्य केले आहे.

निलेश राणे ट्विटमध्ये म्हणतात, "आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो. स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की मी नेहमी जाऊन सेंटर मध्ये नाचतो. नाचा, जेवढं नाचायचं तेवढं 2024 पर्यंत नाचून घ्या." (MLA Rohit Pawar Dance Video: आमदार रोहित पवार यांचा ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल)

निलेश राणे ट्विट:

'आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या', असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार पडेल, असं भाकित सातत्याने विरोधकांकडून वर्तवण्यात येते. मात्र 2024 पर्यंत नाचून घ्या, असं म्हटल्यामुळे ठाकरे सरकार 5 वर्ष पूर्ण करणार, असं आता विरोधकांना देखील बहुदा वाटू लागलं आहे. (Rohit Pawar On Nilesh Rane: कोणताही विषय अभ्यास करून मांडला पाहिजे; निलेश राणे यांच्या 'त्या' वक्तव्याला रोहित पवार यांचे प्रत्युत्तर)

दरम्यान, काल आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत जामखेड  मतदारसंघातील गायकरवाडी येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे मनोबल वाढवण्यासाठी झिंगाट गाण्यावर डान्स केला. तसंच तेथील आरोग्यसेवक, रुग्ण, नातेवाईक यांची विचारपूसही केली.