नारायण राणे यांची राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेट (Photo Credits-ANI)

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. त्यावेळी नारायण राणे यांनी राज्यपालांकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या विरोधातील लढाईत अयशस्वी ठरत असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून करण्यात येत आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. राष्ट्रवादीने याबाबत असा दावा केला आहे की राज्यपालांच्या भेटीवेळी कोणत्याही प्रकारच्या राजकीय मुद्द्यावर चर्चा झालेली नाही. राजभवानातून निघाल्यानंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी असे म्हटले की, कोश्यारी यांच्या आग्रहास्तव शिष्टाचार भेट घेतली होती. तसेच कोश्यारी आणि शरद पवार यांच्याध्ये राजकिय मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याच्या गोष्टीवर पटेल यांनी म्हटले की, या दोघांमध्ये एक सामान्य भेट झाली. परंतु त्यावेळी कोणताही राजकीय मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही.(राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी NCP अध्यक्ष शरद पवार राजभवन येथे दाखल)

यापूर्वी सुद्धा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने विरोधी पक्षातील नेते मंडळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा न करता थेट राज्यपालांची भेट घेतात. त्यानंतर काही तासामध्ये राज्यपाल कोरोना व्हायरसमुळे राज्यातील परिस्थिती संबंधित आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावतात. या बैठकीकडे उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवल्याची टीका सुद्धा करण्यात आली आहे.