पत्रा चाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणात भाजप नेते मोहीत कंबोज (Mohit Kamboj) यांचेही नाव आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे (Sanjay Raut) बंधून सुनील राऊत (Sunil Raut) यांनी या प्रकरणात मोहीत कंबोज यांचे नाव घेतले आहे. पत्रा चाळ प्रकरणात जी कारवाई सद्या सुरु आहे ती केवळ आकसापोटी आहे. पत्रा चाळ प्रकरणात नऊ कंत्राटदार आहेत. त्यातील अनेक लोक भाजपचे कार्यकर्ते, नेते आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळते. मात्र राऊत कुटुंबाला या प्रकरणात अडकविण्यासाठी या प्रकरणाचा सुडासारखा वापर केला जातो, असेही सुनील राऊत यांनी म्हटले आहे.
पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांना आधीच अटक झाली आहे. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स आले आहे. या समन्सनुसार त्या आज ईडी चौकशीला सामोऱ्या गेल्या आहे. ईडी कार्यालयात त्यांची सध्या चौकशी सुरु आहे. वर्षा राऊत यांच्यासोबत सुनील राऊत ईडी कार्यालयात आले होते. या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (हेही वाचा, Patra Chawl Scam: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा ईडी कार्यालयात दाखल, पत्रा चाळ प्रकरणात चौकशी)
सुनील राऊत यांनी या वेळी आरोप केला की, पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कंबोज यांचा देखील समावेश आहे. आज केवळ विरोधी पक्षांवर आणि त्यातही जे भाजपविरोधात आवाज उठवतात अशाच लोकांवर ईडीची कारवाई होते पण भाजपसोबत गेल्यास वॉशिंगमधून निघाल्यासारखे सर्वजण स्वच्छ होता. जर सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पत्रा चाळीतील 9 कंत्राटदारांचीही चौकशी करावी. पण हे लोक भाजपचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यावर अशी कारवाई होत नाही. केवळ 50 लाख रुपयांच्या खोठ्या एण्ट्री दाखवून राऊत यांना अडकविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही सुनील राऊत म्हणाले.
आम्ही कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. जी खरेदी झाली आहे ती पूर्णपणे रेडिरेकनर नुसारच झाली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण जी कारवाई सुरु आहे ती कोणाच्या तरी दबावाखील सुरु असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.