शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत या ईडी (ED) कार्यालयात हजर झाल्या आहेत. पत्रा प्रकरणात (Patra Chawl Scam) संजय राऊत यांना अटक केल्यानतर वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स आले होते. आज म्हणजेच 6 ऑगस्टला ईडी कार्यालायत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश या समन्समध्ये होते.त्या नुसार चौकशीला सामोरे जाण्यासाठी राऊत ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
ईडीने पत्राचाळ आणि आलिबाग येथील कथीत जमनी व्यवहारात संजय राऊत यांचा थेट संबंध आहे. हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावे झाले असल्याचा ईडीचा दावा आहे. ईडीने याबाबत सेशन्स कोर्टात काही कादगपत्रे दाखल केली आहेत. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांची ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी झालेल्या सुनावणीत अनोळखी व्यक्तींकडून वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावर मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार करण्यात आले आहेत. त्यामुळे या व्यवहारांची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी ईडीने न्यायालयाकडे केली होती. (हेही वाचा, संजय राऊत यांनी लिहिले विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र; ED प्रकरणात पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार)
दरम्यान, वर्षा राऊत या दुसऱ्यांदा ईडी कार्यालयात आल्या आहेत. यापूर्वी त्या 4 जानेवारी 2022 रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी आल्या होत्या. त्या वेळी ईडीने त्यांची पीएमसी बँक गैरव्यवहारासंबंधी चौकशी केली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीने आगोदरच अटक केली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनाही ईडीने अटक केली आहे. आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीला बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे ईडीने राऊत कुटुंबीयांना धारेवर धरल्याचे चित्र आहे.