संजय राऊत यांनी लिहिले विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र; ED प्रकरणात पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार
Sanjay Raut (Pic Credit - ANI)

महाराष्ट्रातील पत्रा चाळ जमीन घोटाळ्याच्या चौकशीत अडकलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. यासोबतच संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून, जे योग्य आहे त्यासाठी लढा, असा संदेश त्यांनी दिल्याचे सांगितले. या पत्राद्वारे संजय राऊत यांनी कठीण प्रसंगी सभागृहात आणि बाहेर त्यांच्यासाठी आवाज उठवणाऱ्या सर्व विरोधी नेत्यांचे आभार मानले आहेत.

संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, तुमचे खरे साथीदार कोण आहेत हे कठीण काळातच कळते. केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय यंत्रणांकडून माझ्यावर हल्ला होत असताना तुम्ही लोकांनी मला साथ दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. माझा लढा सुरूच राहील, या दबावापुढे मी झुकणार नाही आणि माझा संकल्पही मोडणार नाही. ‘रडायचे नाही लढायचे’ हा बाळासाहेबांचा संदेश मी अंमलात आणणार.’ राऊत यांनी INC, NCP, TMC, DMK, AAP, CPI, CPIM आणि इतर पक्षांच्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी हे पत्र लिहिले आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी राऊत यांची अनेक तास चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी पहाटे त्यांना अटक करून विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना गुरुवारपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. यासह सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांना धमकी दिल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईत आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पत्रा चाळ जमीन प्रकरणातील स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. (हेही वाचा: Ed Summons To Varsha Sanjay Raut: पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स)

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले होते की, ‘लोकांवर खोटे आरोप ठेवले जात आहेत, खोटी कागदपत्रे रचली जात आहेत. शिवसेना आणि महाराष्ट्र कमकुवत करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. संजय राऊत घाबरणार नाही. मी पक्ष सोडणार नाही.’ 28 जून रोजी, संजय राऊत यांना 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाच्या प्रतिबंध संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले होते.