Ed Summons To Varsha Sanjay Raut: पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स
Sanjay Raut & Varsha Raut (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थातच ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. त्यामुळे संजय राऊत कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या पत्रा चाळ प्रकरणी (Patra Chawl Scam) ईडीने वर्षा राऊत यांना हे समन्स पाठवले आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीकडून अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने आजच (4 ऑगस्ट) कोर्टात केला. त्यानंतर ईडीकडून वर्षा राऊत यांना समन्स आले आहे.

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपत होती. त्यामुळे ईडीने पुन्हा त्याना कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. ईडीने त्यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी दिली. या वेळी झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने ईडीने अनेक आरोप आणि दावे केले. यात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावरुन पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबागमधील जमिनीचे सर्व व्यवहार करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. (हेही वाचा, Patra Chawl Scam: संजय राऊत यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी)

वर्षा राऊत यांच्याबाबत केलेल्या दाव्याची काही कागदपत्रेही ईडीने सेशन्स कोर्टात सादर केली आहेत. त्यामुळे लवकच आता वर्षा राऊत यांची या प्रकरणातही चौकशी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. वर्षा राऊत यांची ईडीने या आधीही चौकशी केली आहे. ही चौकशी पीएमसी बँक प्रकरणाशी होती. या प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर राऊत कुटुंबीयांची चौकशी ईडीने केली.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी ) सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांना 10 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी द्यावी अशी मागणी ईडीने केली होती. मात्र, न्यायालायाने 8 ऑगस्ट पर्यंतच ईडी कोठडी सुनावली. संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणात अंमलमजावणी संचालनालयाने अटक केली आहे. ईडी कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना कोर्टासमोर पुन्हा हजर करण्यात आले.