Girish Mahajan Booked for Extortion: भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खंडणीचा आरोप; कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Girish Mahajan | (Photo Credits: Facebook)

भाजप नेते, माजी मंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महाजन यांच्या विरोधात पुणे (Pune) येथील कोथरुड पोलीस ठाणे (Kothrud Police Station) दप्तरी गुन्हा नोंद झाला आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या (Maratha Vidya Prasarak Mandal, Jalgaon ) संचालकांना डांबून ठेवून मारहाण केल्याचाही महाजन यांच्यावर आरोप आहे.

प्राप्त माहितीनुसार हे प्रकरण जुने आहे. साधारण पाच वर्षापूर्वी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाती निवडणूक पार पडली. या निवडणुकीत नरेंद्र भास्कर पाटील यांनी तानाजी भोईटे यांच्या गटाला पराभूत केले. तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत आहे. या प्रकरणात भोईटे गटास गिरीश महाजन यांचा पाठिंबा असल्याची चर्चा नेहमीच असते.

संस्थेवरील ताबा कुणाचा यावरुन निर्माण झालेल्या वादातून निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली. ही तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी दाखल केली आहे. विजय पाटील हे दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू आहेत. दरम्यान, यावरुन भोईटे गटाने विजय पाटील यांना पुणे येथे बोलावले. या वेळी त्यांना चाकुचा धाक दाखवला आणि मारहाणही केली. हा प्रकार सुरु असताना तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची ऑफर दिली. ही घटना जानेवारी 2018 मध्ये घडली. (हेही वाचा, Girish Mahajan: जळगाव येथे एका कार्यकर्त्याकडून भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल)

दरम्यान, वरील घटने प्रकरणात निंभोरा पोलीस ठाण्यात गिरीश महाजन आणि भोईटे गटातील सदस्यांवर 8 डिसेंबर 2020 रोजी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे समजते. तसेच हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचेही वृत्त आहे.