आशिष शेलार आणि राज ठाकरे | (Photo courtesy: Archived, Edited Images)

भारतीय जनता पक्ष ( Bjp)मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष ( MNS Chief) राज ठाकरे ( Raj Thakrey ) यांची त्यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज' (Krushnkunj) येथे जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये घडलेली भेट ही कौटुंबिक स्वरुपाची होती असे सांगितले जात आहे. मात्र, या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 2019 या नववर्षातील पहिल्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच येत्या 27 जानेवारी या दिवशी राज यांचा मुलगा अमित ठाकरे याचा विवाह आहे. त्यामुळे या विवाहासाठी भाजपाच्या कोणाकोणाला निमंत्रण द्यायचे यासंबंधीची चर्चा या बैठकीत झाल्याचे वृत्त आहे. परंतू, या चर्चेसोबत या बैठकीत राजकीय विषयावर काय चर्चा झाली? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

अमित ठाकरे याचा विवाह सोहळा येत्या 27 जानेवारीला मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील लोअर परळ भागात असलेल्या सेंट रेजिस या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित ठाकरे मताली बोरुडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकत आहे. मिताली ही बॅरिअॅट्रिक सर्जन संजय बोरुडे यांची मुलगी आहे. आमित आणि मिताली हे दोघेही एकमेकांचे दीर्घकाळापासून मित्र राहिले आहेत. दीर्घकाळच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात आणि आता लग्नात होत आहे. (हेही वाचा, Amit Thackeray Mitali Borude Wedding : राज ठाकरेंची होणारी सून Mitali Borude नेमकी कोण ?)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज आणि शेलार यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. इतका प्रदीर्घ काळ चर्चा झाल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. केवळ लग्न आणि निमंत्रण या विषयावर इतका दिर्घकाळ संवाद होऊ शकत नाही. या विषयासोबतच आगामी विधानसभा आणि लोकसबा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे. दरम्यान, शेलार आणि ठाकरे यांच्यात झालेली ही पहिलीच भेट नाही. या आधीही या दोघांमध्ये अनेकदा बैठका झाल्या आहेत.