Ashish Shelar Criticizes Thackeray: मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची अधिक चिंता- आशिष शेलार
Ashish Shelar (PC - PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चांगली जुंपली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) निर्णयांवरून भाजपचे नेते वारंवार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडत आहे. यातच राज्यात अनलॉकच्या प्राधान्यक्रमावरून भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. 'मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता जास्त आहे,' अशी टीका त्यांनी केली आहे. ठाकरे सरकारने वर्षभरात राज्याची दयनीय अवस्था केली, त्याचा मतदारांनी मत पेटीतून निषेध करावा. ठाकरे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे, असेही आशिष शेलार म्हणाले आहेत.

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने आशिष शेलार हे पुण्यात आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली. दरम्यान, ते म्हणाले की, महाविकास आघाडी हे पळपुटे सरकार आहे. राज्यात शेतकऱ्यांची मदत केली जात नाही. शिक्षणाबाबत सावळागोंधळ आहे. राज्यातील जनतेने कोणतीही मागणी केली की, ते केंद्राकडे बोट दाखवतात. मंदिर उघडा म्हटले की, हे मुहूर्त काढणाऱ्यांकडे बोट दाखवतात. पब, बार आणि रेस्टॉरंट उघड्याण्याच्या आधी मंदिरे उघडा, ही मागणी अवास्तव नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरांपेक्षा बॉलिवूड आणि त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता अधिक आहे,' अशी टीका आशिष शेलार यांनी ठाकरे सकारवर केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: मुंबई-दिल्ली विमान, रेल्वे सेवा पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता, प्रस्ताव विचाराधीन असल्याची चर्चा

तसेच. राज्यात शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु, शासन म्हणून काही करणार आहात की नाही? शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात येत असताना राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकार संभ्रमावस्थेत आहे. यामुळे राज्य सरकारची पुढे काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर, सगळ्यांनाच महागात पडले, अशी चिंता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.