Coronavirus: मुंबई-दिल्ली विमान, रेल्वे सेवा पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता, प्रस्ताव विचाराधीन असल्याची चर्चा
Mumbai-Delhi Railway Services Likely Closure | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग थोपविण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यातून निर्माण झालेली स्थिती सुधरवण्यासाठी अनलॉक करण्यात आला. आता कुठे परिस्थीती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तोपर्यंतच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई-दिल्ली विमान (Mumbai-Delhi Flight Services) आणि रेल्वे सेवा (Mumbai-Delhi Railway Services) बंद पुन्हा एकदा बंद करण्याबाबत विचारविनीमय सुरु आहे. सरकारने अशी कोणतीही घोषणा अद्यापपर्यंत केली नाही. परंतू, असा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असे तज्ज्ञच म्हणत होते. त्यात आता दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली येथे काही प्रमाणावर पुन्हा एकदा निर्बंध लावले जात आहेत. त्यातच आता मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारही सावध पावले टाकताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली-मुंबई विमान, रेल्वे सेवा यांच्यावर निर्बंध येऊ शकतात, असे वृत्त इंडिया टुडेनं सूत्रांच्या हाव्याने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्तांनी नुकताच आदेश दिला आहे त्यानुसार मुंबई महापालिका शाळा (BMC Schools ) आता थेट पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये सुरु होणार आहेत. महापालिका आयुक्त आय एस चहल ( I S Chahal) यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शाळा 31 डिसेंबर (BMC School Closed Till December 31) पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा या दिवाळीनंतर सुरु होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतू, आता थेट पुढच्याच वर्षी शाळा सुरु होणार असे स्पष्ट झाले आहे.